श्री सदगुरुंचे संकल्प सिद्ध असतात. नाथाची ही प्रवाही परंपरा कुठे कुठे वाहणार हे त्यांनी आधीच ठरविले असते. श्री. रामचंद्र महाराज तिकोटेकरानंतर हि शांभवी गंगा, करवीरच्या पंचगंगेत येउन मिळाली अन चांगलीच संथ झाली. याच किना-यावर परंपरेतील पुढचे तीन सत्पुरुष झाले.
शिवस्याभत्नरे शक्ति: शक्तेरभ्यन्तरे शिव: । (सिद्धसिद्धांत पद्धती ) शिवशक्ती ऐक्याचे प्रतिपादन करणारी ही परंपरा करवीर सारख्या शक्तीपीठात येउन स्थिरावली. याला योगायोग खचितच म्हणता येणार नाही.
श्री क्षेत्र कोल्हापूर जवळचे पेठ वडगाव हे श्री विश्वनाथ महाराजांचे मूल गाव. पराक्रमी कुलातील श्रीमान लक्ष्मणराव श्रीखंडे हे त्यांचे वडील तर विश्वनाथ हे त्यांचे सर्वात कनिष्ट अपत्य होय. बालपणीच विश्वनाथांचे मातृपितृछत्र हरपले व आजोबा हेरवाडकरांच्या आजोळी विश्वनाथ महाराज दत्तक गेले.आजोबांनी नावे ठेविले ‘गोविंद’ श्री माऊलींनी सहाव्या अध्यायात वर्णिल्याप्रमाणे ‘बालपणीच सर्वज्ञता ‘ लाभलेल्या विश्वनाथ महाराजांच्या लहानपणच्या दोन कथा प्रसिद्ध आहेत. इचलकरंजीच्या समंधबाधित घराण्यातील राजास राजवाड्यासमोरील व्यंकटेश मंदिरातील जळलेल्या पुरुषाचा दाखला विश्वनाथ महाराजांनी बालपणीच दिला होता. दुसरा प्रसंग याहीपेक्षा सुंदर आहे. जुनाट पोटदुखीच्या आजाराने त्रस्त झालेले महाराजांचे ज्येष्ठ बंधू श्री बळवंतराव तेंव्हा पंढरपुरी येउन राहिले होते. ज्येष्ठ बंधू पांडुरंग अर्चनात व्यस्त असताना श्री विश्वनाथ महाराज मात्र गुदोजी बुवांच्या मठात ज्ञानेश्वरीत अन चक्रीभजनात मग्न असत. एकदा झालेल्या दृष्टांतानुसार त्यांनी बंधुंना विठ्ठलमंदिरी न जाण्यास आर्जविले. पण नित्यनेम चुकू नये म्हणून बळवंतराव गेले अन पठाडी गोम चावून गरुड मंडपात मूर्च्छित झाले. हे कळताच बाळ विश्वनाथ महाराज गुंडोजींच्या देवघरातील विभूती घेवून धावले. चिमूट्भर विभूती मुखात घातली व बंधूना सावध केले. श्री गुरुपरंपरेतून आलेल्या ‘ज्ञानेश्वरी’ व ‘चक्रीभजनांच्या’ अधिष्ठान पीठातील विभूती श्री पांडूरंगांच्या सेवेपरिस कांकणभर श्रेष्ठ ठरल्याची अनुभूती सर्वांनाच झाली. पण त्याचमुळे सदगुरू तत्वाच्या सगुणरूपाची आंतरिक ओढ दृढावली अन विश्वनाथ महाराज श्री सदगुरु शोधार्थ निघाले.
श्री क्षेत्र करवीर, दक्षिण काशी चातुर्मास सुरु असता श्री विश्वनाथ महाराज करवीरी परतले. याच नगरीतल्या एका मंदिरात श्री. रामचंद्र तिकोटेकर ज्ञानेश्वरीच्या अक्षरांतल्या ब्रम्हसाम्राज्य दीपिका उजळून दिवाळी साजरी करत होते. विश्वनाथ महाराजांनी ते डोळे टिपले, अंतरीची खूण पटली अन त्यांनी चरणांवर लोळण घेतली. रामचंद्र तीकोटेकरांनी प्रेमाने उठविले अन श्री ज्ञानेश्वरी उपासनेचा ‘आदेश’ केला. विश्वनाथ महाराज व्यास मठात पारायण करू लागले. या पारायणांमुळे योगिक प्रक्रियेने उष्णता वाढुन तळहातावर ‘वाघचवडा’ नावाचा फोड आला, पण महाराजांनी खंड पडू दिला नाही. अखेर ती पारायणे फळास येण्याचा शुभदिवस उजाडला. श्री. सदगुरूंनी विश्वनाथांना पद्मासनात बसविले, नेत्र आज्ञा चक्री नेण्यास सांगितले, परंपरा सांगुन मंत्र दिला अन सुषुम्नेत सळसळणारी ती कुंडलिनी आज्ञाचक्रांत आली नि ‘मरुत’ तत्वात विरून गेली. श्री सदगुरु चरणांहून घेतलेला श्वास ब्रम्हरंध्री स्थिरावला आणि बाळ ‘गोविंद’ विश्वाचा ‘नाथ’ झाला, ते याच मंगलक्षणी . अनुग्रहच नव्हे तर परंपरा पुढे चालविण्याचा आदेशही मिळाला. विश्वनाथ महाराजांनी धन्यतेने आनंदअश्रू पुसले, स्वत:स सावरले आणि पुनश्च चरण वंदून आपले मूळगाव अर्थात ‘पेठवडगाव’ गाठले. पिंडी ते ब्रम्हांडी हि ग्रंथातरीची खुण आता अनुभवातुन विसावला होता. पंचक्रोशीतील भक्त – अभक्तांच्या व्यथांच्या निरसनार्थ महाराजांनी पांडुरंगाच्या मंदिरात ज्ञानेश्वरी निरुपण कीर्तन सुरु केले. तेज: पुंज मूर्ती , पायात चाळ, हातात चिपळ्या आणि रंगलेले कीर्तन – नामदेवराय म्हणतात – वैष्ण्वाघारी सर्वकाळ । सदा झणझणती टाळ ।।
नेमक्या याच वेळी पोटचा पुत्र आणि कांता ईश्वराघरी गेली अन महाराज भक्तांच्या संसारात रममाण झाले. अशाच एका सायंकालीन निरुपणानंतर रुकडीच्या लक्ष्मीबाई कुलकर्णी महाराजांच्या चरणांशी लीन होऊन सुनेच्या वंध्यत्वासाठी उपाय विचारत्या झाल्या. महाराजांनी त्यांना आश्वासिले, आपल्या सदगुरूंना साधनेत विचारले व त्यानुसार श्री मारुतीरायांच्या उपासनेची आज्ञा केली. लक्ष्मीबाईचे सुपुत्र श्री. नारायणराव कुलकर्णी व सूनबाई चंद्राबाई अत्यंत दृढ श्रध्देने उपासना करू लागले. शुद्ध बीजापोटी, फळे रसाळ गोमटी. चंद्राबाईस यथावकाश ‘माधव’ . ‘गोविंद’, ‘व्यंकटेश ‘ नी ‘यशवंत ‘ ही चार पुत्ररत्ने व ‘अक्का ‘, ‘नानी’ व ‘सोनाबाई’ अशी तीन कन्यारत्ने प्राप्त झाली.
घरातील संतानविषयक समस्या जरी संपली असली तरी उपासनेने चित्तशुद्धी झालेल्या नारायणरावांचे मन आता अध्यात्माकडे अधिकच ओढ घेऊ लागले. ‘ज्ञानेश्वरी’ अन ‘गुरुचरित्रात ‘ रमू लागले. एका आर्तक्षणी नारायणरावांनी विश्वनाथ महाराजांस अनुग्रहसाठी प्रार्थिले खरे, पण त्यांना पुढे श्री रामचंद्र महाराजांचा अनुग्रह झाला. विश्वनाथ महाराजांनी ‘सदगुरू ‘ होण्यापेक्षा गुरुबंधू होण्यास धन्यता मानली. पुढे मातृशोक झालेल्या याच गुरुबंधू नारायणरावांच्या सदनी वास्तव्य करावी अशी विश्वनाथ महाराजांस सदगुरू आज्ञा झाली आणि विश्वनाथ महाराज ‘ रुकडीकर’ झाले.
महाराजांनी आता रुकडीत भक्तिप्रेम सुखाची पेठ वसविली. गावोगाची भक्तमंडळी रोजच्या ज्ञानेश्वरी प्रवचन – श्रवणास्तव जमु लागली. नारायणराव आणि कुटुंबीय श्री महाराजांच्या सेवेत रमून गेले. साक्षात द्वारकेचा राणा इथे पांडवाघरी राहायला आला होता.श्री महाराजांची रुकडीतील दिनचर्या म्हणजे श्री ज्ञानेश्वरीतल्या ६ व्या अध्यायाचं प्रात्यक्षिकच जणू . पहाटे साधना , नंतर देवपूजा , मग ज्ञानेश्वरी , ‘मितुला ‘ आहार , दुपारची अल्पशी विश्रांती , संध्याकाळी मळयात पंचगंगातीरी अन रात्री कीर्तन आणि निरुपण असा दिनक्रम . पण अंतरीचे अनुसंधान मात्र रात्रंदिवस . याच दरम्यान चंद्राबाई कुलकर्णी काळाच्या पडद्याआड गेल्या . सदगुरू भाष्यार्थाने माउली असतातच, पण इथे शब्दश: माऊली झाले . माधव , गोविंद , व्यंकटेश आणि यशवंत यांचे नंतरचे संगोपन स्वतः विश्वनाथ महाराजांनी केले . ‘नाथा घरची उलटी खूण’ म्हणतात ती ही . पुढे चौघांनाही अनुग्रहीत केले . गोविंदाचा गोविंदनाथ केला . तो प्रसंग मोठा अदभुत आहे . एके दिवशी विश्वनाथ महाराजांना हवा असणारा एक कागद शोधण्यासाठी भाऊदादांनी (गोविंदनाथ महाराज ) रामचंद्र महाराजांच्या पादुकासमोरची ज्ञानेश्वरी उघडली . विश्वनाथ महाराजांना अवस्थेत स्फुरलेले अनुभव शब्दांकित केलेला तो कागद हाती घेताच अदभुत आकाशपट झाला आणि विरत विश्वरुपात नटलेल्या श्री विश्वनाथ महाराजांचे तिथे दर्शन झाले . काही वेळानंतर भानावर येताच भाऊदादा महाराजांकडे धावले . महाराजांनी पहिले , क्षणात सारे जाणले व त्या परमानंदातच ‘दोवरी दोन्ही । भुजा आलो घेवोनी ।। आलिंगावया तुझे आंग ।।’ म्हणत दृढ आलिंगन दिले .’ये हृदयी ‘ घातले अन गोविंदाचा ‘गोविंदनाथ केला’ ।
याच काळात रेल्वे पुलाच्या कामासाठी रुकडीत आलेले पुण्याचे इंजिनिअर श्री गणेश वैद्य पुत्रप्राप्तीच्या मनीषेने विश्वनाथ महाराजांच्या चरणांशी आले आणि ज्ञानेश्वरीच्या रंगात रंगून गेले . राऊंची दृढ श्रदधा व उपासना महाराजांनी त्यांस अनुग्रहित केले व ‘गणेशनाथ ‘ ही नाममुद्रा दिली. पावसचे सुप्रसिदध स्वरूप ‘ स्वामी स्वरूपानंद हे गणेशनाथ महाराजांचेच सत्शिष्य होत. राऊभाऊ आता विश्वनाथ महाराजांभोवती घिरट्या घालत . पण दोन समर्थ शिष्य घडविल्यानंतर महाराज आता विरक्त होवू लागले . एकांतात रमू लागले. ज्ञानी पुरुषांच्या लक्षणांत माउली म्हणतात , ‘बहु एकांतावरी प्रीती’ । किंवा तुकोबारायांच्या शब्दांत , ‘ बैसता एकांती गोड वाटे ।’ अशाच एका सायंकाळी पंचगंगा काठच्या मनात समाधान झाल्यावर महाराज म्हणाले , ‘ ही भूमी साधी नव्हे . इथे ढवळ्या नंदीवर आरूढ झालेले शिवपार्वती मला दिसले. या नाथांच्या भूमीत अखंड सदगुरू स्मरणात रमावे असे वाटते ।’ महाराजांच्या शब्दातला अर्थ मनोमन समजत राऊ-भाऊ जागीच थरारले . त्या रात्री राऊंनी महाराजांकडे पुण्यात ज्ञानेश्वरीचा सप्ताह करावा अशी प्रार्थना केली. महाराजांनी राऊ-भाऊंचे मनोगत ओळखले. महाराज पुण्यास आले. ज्ञानेश्वरी सप्ताह थाटात सांग झाला. भाऊदादांनी निरुपणाला ओवी निवडली . ‘ इथे शरीराची माती । मेळवीन तिये क्षिती ।। सप्ताहानंतर सर्वजण आळंदीस माऊलीच्या भेटीस गेले. वासरानं माउलीकडे झेप घ्यावी , तशी झेप घेत महाराज माउलीच्या समाधीला बिलगले. अश्रूंनी अभिषेक केला व म्हणाले , ‘ माउली , हा ओला चिखलाचा गोळा तूच चाकावर चढविलास, घटाकार दिलास, त्यातून अमृत वाटून धन्य केलंस. आता तुझ्याच आज्ञेने तो तुझ्या पायाशी आणून ठेवतो व तुझ्या पायाशी उतरून ठेवतो व तुझ्या स्मरणात स्वस्थ होतो .’ निरोपाचे हे बोल ऎकून राऊभाऊ मनोमन थरारले. महाराज रुकडीस परतले अन देहीच विदेहावस्था भोगू लागले. अखेर तो निर्वाणीचा दिवस उजाडला , माघ शुद्ध तृतीय शके अठराशे चाळीस.
‘श्री विश्वनाथ महाराज चरित्रामृतांत ‘ हंसगीत’ म्हणतात – त्यादिवशी भर दुपारी । सूर्य येता माथ्यावरती ।
पाहुनी सोsहं परमहंसाची भरारी । दिग मूढ होऊन थांबला ।।(५०२)
महाराजांनी पदमासन घालून । सोsहं उर्ध्वमुखे त्रिवार आळवून ।
प्राण ब्रम्हारंध्री नेवून । शिवस्वरूप मेळविल ।।(५०३)
महाराजांनी दाखवलेल्या पंचगंगा काठच्या मळातल्या जागी महाराजांची मुर्ती पालखीतून आली. विठठल नामाचा गजर चालू होता . आम्रवृक्ष चक्या ढाळीत होते, वारा वेळू वनात
बासरी वाजवत होता . पंचगंगा पसायदान म्हणत आणि इकडे –
शुद्ध कर्पुरी देहाला । कर्पुरी ज्योतीचा स्पर्श झाला ।
निरंजन निरंजन मिसळला । ॐ शांतिः शांतिः शांतिः ।।