श्री ज्ञानेश्वर माऊली मंदिर कसे व कशासाठी बांधावे हे सांगतात. ‘मंदिर’ याचा अर्थ जेथे ‘मंगल’ मय वातावरणाची अनुभूती येते. ‘दिव्यत्वाची ‘ प्रचिती येते. ‘रमणीयतेने मन प्रसन्न होते.’ श्री माउली सांगतात, मंदिराची उभारणी करताना पाया हा भक्कम अशा वैराग्याचा व त्यातून सदगुरू आशीर्वादाने घडलेल्या साधनेचा, एकनिष्ठेचा पाया इतका भक्कम असावा की, इतर विकार, वासना, अहंकार शिरण्यास वाव नाही. चिरेबंद तपाची, साधनेची परिपूर्तता म्हणजे भक्ती.
शरीर, मन व बुद्धी ही निर्दोष होणे, सात्विक होणे व त्याला खर्या आनंदाची ओढ लागून त्याच्या जाणीवेतून अध्यात्मिक जीवन जगता जगता हरि प्रेम भक्तितून ‘साधन’ मार्गातून प्रकृतीचा निरास साधून हरिपर्यंत पोहोचून परमानंदाचा धनी व्हावे या मूळ उद्देशातून ‘विश्वपंढरी’ साकारलेली आहे.
१. शारिरिक व्याधीपासून मुक्तता व शारिरिक क्लेश कमी व्हावेत म्हणून दादांनी त्यांना प्राप्त कृपा सिद्धीतून आयुर्वेदिक चिकित्सेचे प्रयोजन आखले व त्यातूनच साकारले विश्ववती चिकित्सालय! जेथे सेवावृत्तीतून योग्य व माफक दरात या सेवा सर्वांना उपलब्ध व्हाव्या ज्यातून शारिरिक वेदनेतून मुक्ती मिळवून लाभधारकाने संस्थेच्या उपक्रमामध्ये सहभागी व्हावे त्याला सत्संगाची प्राप्ती व्हावी, शरीर शुद्धितून शरीर तादात्म्य भावाचा विळखा सैल व्हावा हा उद्देश.
२. मानसिक शांतीसाठी सदैव सदगुरूंचे मार्गदर्शन व विश्वमानवता मंदिरातून हरि दर्शन, पूजन अर्चनाचा लाभ व्हावा व नैमित्तिक सणवार व उत्सवातून सहभागी होऊन मन : शांतीचा लाभ व्हावा म्हणून लौकिक अर्थांने मंदिराची योजना आहे. जेथे श्री गणेश , श्री विठ्ठल रुक्मिणी, श्री भगवती देवी, श्री आदिनाथ, श्री दत्तगुरू व श्री हनुमंतांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केलेली आहे. ज्यातून हरि आवड, प्रेम उदयाला यावे.
३. ज्ञान साधनेसाठी दरवर्षी श्री विश्वनाथ महाराज पुण्यतिथी निमित्य प्रवचन, कीर्तन, पारायण यांचे आयोजन केले जाते. त्यातून अध्यात्मिक जीवनाबद्दलची माहिती ज्ञान यांचा प्रचार होऊन सामाजिक उदबोधन होऊन मनुष्य सात्विक व नीतीमान व्हावा त्याला धर्माची जाण यावी हि अपेक्षा. त्यासाठी मंदिरासमोरच ६००० चौ. फुटाच्या खुल्या चौकाचे प्रयोजन व त्या अनुषंगाने स्टेज व इतर बैठक सोईची उपलब्धता केली असून त्यातून चित्तशुद्धीची प्राप्ती होऊन मन बुद्धिचे ऐक्य घडावे ही अपेक्षा आहे.
४. उत्सव, प्रवचन, कीर्तन सोहळ्यातून घडलेल्या यज्ञातून ज्ञानाची जिज्ञासा वाढीस लागावी व तिच्या पूर्ततेसाठी ‘गोविंद निवास’ या वास्तुमध्ये अध्यात्मिक ग्रंथ, पुस्तके व नियतकालिके साधकांसाठी उपलब्ध केली आहेत. येथे राहण्याचीही व्यवस्था असून ज्ञान साधनेसाठी सर्व सुखसोई उपलब्ध आहेत. येथे नियमित, पारायण, जप, ध्यान शिबिरे घेतली जातात तसेच स्वाध्याय वर्गातून साधकांना मार्गदर्शनाचाहि लाभ होतो. ज्यातून श्रद्धेला बुद्धीची जोड मिळून ती बलवान व्हावी ही अपेक्षा.
५. सदर संकुल हे अध्यात्मिक साधनेचे संकुल असल्यामुळे सर्व सामान्यांच्या हिता बरोबरच सदगुरुंच्या पारंपारिक साधनेचा विचार, अनुग्रहित साधकांसाठी विशेषत्वाने केलेला आहे. त्यांचेसाठी लौकिक मंदिराचे आतील बाजूस ज्येष्ठ सदगुरुंच्या समाधीचे पादुकांचे अधिष्ठान आहे. त्यामुळं ही एक वैशिष्टयपूर्ण मंदिरवास्तु झालेली आहे. प. पू. दादांच्या दृष्टीतून अनुग्रहितांनि बहिरंग साधना करीत असतांना श्री सदगुरुंच्या समाधी दर्शनानंतर त्याच्या कृपेतून तळघरातील सामुदाईक व वैयक्तीक साधना गुंफ़ेचा वापर अंतरंग साधनेसाठी करावा व अध्यात्मिक प्रगती साधावी. समाधी अनुभूतीतून वैकुंठाची प्राप्ती ‘विश्वपंढरीतून’ करून घ्यावी.
६. सार्वजनिक सामाजिक उत्सव, पारायण, ध्यान शिबिरे, इत्यादि कार्यक्रमाला येणार्या भक्तांच्या भोजन प्रसाद व्यवस्थेसाठी प्रशस्त स्वयंपाक घर तसेच वेगळ्या भोजन हॉलचीहि व्यवस्था केलेली आहे.या सर्व व्यवस्थेवर व योजनांवर सदगुरू मार्गदर्शन लाभते. वास्तुचा उपयोग योग्य कारणांसाठी योग्य पद्धतीने व शिस्तीचे व्हावा म्हणून श्री सदगुरुंच्या निवासाची व्यवस्था तसेच पुजारी व इतर सेवकांचीही राहण्याची व्यवस्था विश्वपंढरी मध्ये केलेली आहे.
विश्वपंढरीतील खुल्या चौकांची योजना हे तर दादांचे वैशिष्ट्य! ज्यातून आपण सातत्याने निसर्गाशी जोडले जातो. मोकळेपणा राहतो. ज्यातून आपली संकुचित आत्मकेंद्रित वृत्ती हि कमी होऊन आपण त्या विश्वातील एक अंश बनुन रहातो. आपले जीवन हे सहजीवन होते व सहयोगातून ‘आनंद’ ह्या संकल्पनेची अनुभूति येत रहाते.
मोठया उत्सवासाठी ६००० चौ. फुटाचे अंगण व सभोवती ओवर्या, समोर पांडुरंगाचे अधिष्ठान जेणे करून येथील सर्व कार्यक्रम त्याच्या साक्षीने व कृपाछत्राखाली व्हावेत म्हणजे प्रत्येक कार्यक्रमाला एक नैतिक व अध्यात्मिक अधिष्ठान प्राप्त होते.
मंदिरा खालील तळमजल्या वरील ध्यानगृहाची आखणी ही सुद्धा वैशिष्ट्यपूर्ण आहे. सर्वसाधारणपणे ध्यानासाठी केवळ एखाद्या हॉलची व्यवस्था असते ज्याला ध्यान हॉल म्हणतात. पण दादांच्या योजने प्रमाणे येथे मधोमध श्री आदिनाथांचे अधिष्ठान असून आदिनाथांची ध्यानस्थ मूर्ति प्रतिष्ठापित केलेली आहे. समोर सदगुरू श्री आदिनाथांच्या समवेत साधनेला बसलेले असतात.साधकांच्या साठी अर्धगोलाकार पाय-यांची व्यवस्था केली आहे . त्यावर कायम स्वरुपाची आसन व्यवस्था केली आहे. साधकांने ध्यान गुंफे मध्ये प्रवेश करताच ध्यान गुंफेतील पवित्र वातावरणामुळे त्याला साधनेची ओढ लागते. त्याच्या व्यतिरिक्त आंतील बाजूस साधनेसाठी स्वतंत्र छोटया खोल्यांचीही वेगळी व्यवस्था आहे. असे हे ध्यान गृह ही विश्वपंढरीची खासियत आहे.
आपल्या विश्वपंढरीत आणखिन काय आहे याचे उत्तर म्हणजे, या पहा, जाणा, जाणून घ्या, त्याच्याशी एकरूप व्हा म्हणजें “शब्देविण संवाद” सुरु होईल.