दादा- दादा महाराज – माधवनाथ सांगवडेकर ! नावं वेगळी पण व्यक्ती एकच ! गुलाबाला कोणत्याही नावानं हाक मारा – सुगंध तोच, तसंच दादाचं ! तेच प्रसन्न हास्य, मृदू मवाळ बोलणं – तोच कृपा कारुण्यानं ओथंबलेला स्पर्श, दिक्कालाचे वेध घेणारी तेजस्वी दृष्टी. माऊलीनं सांगितलेल्या ‘अमानित्त्व’ या गुणांचा सगुण साक्षात्कार म्हणजेच श्री दादा महाराज सांगवडेकर – एक अलौकिक विभूती आणि समर्थ सदगुरु !!! अशा परमपूज्य श्री सदगुरु दादा महाराज सांगवडेकर यांनी स्थापन केलेला श्री विश्वनाथ महाराज रुकडीकर ट्रस्ट सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व अध्यात्मिक कार्याद्वारे समाजामध्ये नीतीमूल्यांची जोपासना करण्याचे कार्य करत आहे. आज देशाला संत – विचारांची गरज असून विज्ञानाला ज्ञान व विवेकाची जोड मिळाल्यास देशाची प्रगती जोमाने होऊन संपूर्ण जगात भारताचा नांवलौकिक द्विगुणीत होईल असा आमचा ठाम विश्वास आहे. आज संपूर्ण जग एक वैश्विक खेडं बनू पाहत असताना वैचारिक जवळीकता व विश्वबंधुत्व प्रस्थापित होणे गरजेचे आहे. समस्त भूतमात्रांमध्ये ईश्वराचा अंश आहे असे प्रतिपादन करून भेदाभेद नष्ट करणारे व संपूर्ण विश्वाच्या कल्याणासाठी पसायदान मागणारे संतश्रेष्ठ श्री सदगुरु ज्ञानेश्वर माऊली हे आमचे आराध्य दैवत आहे. आपले उदिष्ट साध्य करण्यासाठी ट्रस्ट विविध उपक्रम राबवित असतो.