|| प. पू. श्री. सदगुरू विश्वनाथ महाराज ||

साधु म्हणावे तयासी । दया क्षमा ज्याच्या दासी ।
जयापासी नित्यशांती । संत जांणा आत्मस्थिती ।।

madhavdada

श्री सदगुरू दादांचं चरित्र शब्दबद्ध करावयाचं तर संतांचेच शब्द हवेत. कारण
अर्जुनासम केवळ अर्जुनच ! दादा म्हणजे ‘ लाभावीण प्रीती ‘ करणारी ‘कळवळ्याची जाती ‘! दादा म्हणजे ‘निरंतर कारुण्यसिंधु ‘ अन ‘निर्व्याज प्रीती ‘ ! दादा म्हणजे स्वच्छता ! सुगंध ! आणि साधना ! दादा म्हणजे ‘ते वाट कृपेची करितु । ते दिशाचि स्नेहाभरीतु । जीवातळी आंथरितु । आपुला जिवु ।।’ या माउलींच्या ओव्यांच मूर्तीमंत रूप ! दादा म्हणजे ‘शब्द पाठी अवतरे । कृपा आधी ।।’ चा अनुभव ! दादा म्हणजे नाथांची ‘परमशांती’ , तुकोबांची ‘निरहंकारिता’ आणि माऊलींची ‘सहजसुंदर तितिक्षा’ यांचा विलक्षण ‘मिलाफ’ ! दादा म्हणजे ‘शब्दाहुन आचार मोठा’ असणारे संत ! दादा म्हणजे ‘ना आदि गुरु शंकरा’ पासोनी चालत असलेल्या तापासी योग्यांच्या परंपरेतला एक अनोखा ‘प्रेमसिध्द’ ! दादा म्हणजे ‘आनंदतरंगांचा डोह ‘ ! दादा म्हणजे ‘आनंदाचे अंग ‘ !
दादांसारखं ‘रसाळ’ आणि ‘गोमट’ फळ जन्माला यायचं तर भूमीही तशीच हवी ! दादांचे वडील श्री . बापूसाहेब हे एक विवेकसंपन्न, कर्तबगार आणि करारी व्यक्तिमत्व ! श्री विश्वनाथ महाराजांचा अनुग्रह , नरहरीवर दृढ भक्त्ती, आणि त्यातून कृतार्थ झालेला संसार ! मुळचे रुकडीकर पण नंतर सदगुरू आज्ञेने सांगवडेकर ! आई आनंदीबाई या मुळच्या चिमड सांप्रदायिक श्री . अंबुराव महाराजांच्या व नंतर श्री . गोविंदनाथ महाराजांच्या अनुग्रहित व निष्ठावंत चरणसेवक ! घरांत सदगुरू गोविंदनाथ महाराज व अण्णा महाराजांसारख्या सिद्धांचा वावर ! अशा वातावरणात दादांचा जन्म झाला तो शुभ दिवस होता २७ मार्च, १९३२, फाल्गुन वघ पष्ठी अर्थात नाथ पष्ठी ! पुढे माऊली आनंदींना बाळ, अप्पा व राम अशा तीन पुत्ररत्नांचा लाभ झाला.

दादांचं बालपण सार्‍या वडिलधार्‍याच्या प्रेमळ सहवासात सुरु झाले. दादा बालपणीच उत्तम भावभक्त होते. आरती करताना देवघरात भाऊदादांच्या मांडीवर बसत असत. शाळेत जाण्याआधीच ज्ञानेश्वरीतल्या कित्त्येक ओव्या पाठ होत्या. दादा ज्या भक्तीभावाने विश्वनाथ महाराजांच्या पादुकांस अत्तर लावत, त्याच भावाने भाऊदादांच्या बुटांना पॉलीश करत. ‘न गुरोरधिकं न गुरोरधिकं न गुरोरधिकं न गुरोरधिकं ।’ हे सूत्र त्यांनी बालपणीच ‘जाणलं’ होत. रुकडीच्या वाड्यातच त्यांची ज्ञानेश्वरीही सुरु झाली. पुढे बापूसाहेब पत्नी व मुलांसोबत कोल्हापूरला राहायला गेले. रुकडी सोडताना भाऊदादांनी आनंदीआईसाहेबांच्या ओटीत काय घातलं असेल ? आपलं आत्मलिंग ! अर्थात नित्याच्या पूजेतल्या साक्षात ‘विश्वनाथ महाराजांच्या खडावा !’ कोल्हापुरच्या शक्तीपिठातले बापुसाहेबांचे घर हेच आता विश्वनाथ महाराजांचे ‘अधिष्ठान पीठ’ झाले होते. हिच सांगवड्याच्या श्री नृसिंहाचीही इच्छा होती ! अर्थात सांगवड्यांशी आपला स्नेह दादांनी शेवटपर्यंत जपला हा भाग निराळा.

दिवसामागून दिवस जात होते, दादांची १० वी झाली आणि १९५१ ची संक्रांत अक्षरशः संक्रांतबनून आली. न्युमोनियाचं निमित्त झालं आणि बापूसाहेब निवर्तले. घरात आनंदीआईसाहेब, दादा व भावंडांवर दुःखाचा डोंगर कोसळला. पण आनंदी आईंनी मोठ्या धडाडीने सांगवड्याचा वाडा व शेतीत लक्ष घालायला सुरवात केली. प . पू . भाऊदादा व प . पू . आण्णा महाराजांचे येणं नित्याचं होत गेलं. नंतर दादांनी फोटोग्राफी व दिग्दर्शनाच्या शिक्षणासाठी मुंबईची वाट धरली. काही काळ सहाय्यक दिग्दर्शक म्हणून तिथेच काम करून पुढे प्रसंगवशात कोल्हापुरी परतले. कोल्हापुरात आल्यावर शिवभक्त भालजी पेंढारकरांच्या जयप्रभा स्टुडिओत जाऊ लागले. चलचित्रनिर्माता, सहाय्यक दिग्दर्शक म्हणून दादांनी मराठी चित्रपट सृष्टीच्या त्या सुवर्ण काळात २०-२२ वर्षे काढली असं म्हणण अगदीच लौकिकाचं ठरेल. कारण याचवेळी चेह-याला रंग लावलेल्या त्या दुनियेचं चित्रीकरण करून झाल्यावर दादा घरी येत , स्वच्छ पाय धुत व आपल्या नित्याच्या साधनेत रममाण होत!

दादांचा अनुग्रहाचा दिवस म्हणजे १९५७ ची ‘विजयादशमी’ ! याच सीमोल्लंघनाच्या दिवशी भाऊदादांनी रुकडीच्या वाड्यातल्या देवघरात दादा व तिघा भावंडांना अनुग्रहित केले, सोs हं चा मंत्र दिला व ‘ये हृदयीचे ते हृदयी’ घातले. श्वास संथ झाला. दादांनी सदगुरूंची भावपूर्ण पादयपूजा केली. भाऊदादांचा आशीर्वाद मिळाला, ‘प्रपंच करून परमार्थ करा’. पुढे सदगुरू कृपेने दादांनी आपल्या आयुष्यात घातलेली प्रपंच आणि परमार्थाची सांगड हे नाथ महाराजांपश्चातचे महाराष्ट्रातले एक आदर्श उदाहरण म्हणावे लागेल. दादांच्या प्रपंचाची सुरुवात झाली १६ मे, १९६३ रोजी. बेळगावचे थोर अंबिकाभक्त्तश्री . नानासाहेब कुलकर्णी यांची सुकन्या लीला ! बालपणापासूनच कठोर शिवभक्त असणारी ‘लीला’ सांगवडेकारांच्या उंबरठयावरचं माप ओलांडून आत आली अन ‘श्यामला’ झाली ! माधवाची श्यामला ! आनंदीआई सुनेच्या ओटीत ज्ञानेश्वरी घालून म्हणाल्या, ‘ही ज्ञानेश्वरी हाच या घरचा कुलाचार ! याची जपणूक कर’. संसार उत्त्तम सुरु झाला . दादांच्या संसाराच्या मोगरीवर एक पांढरं शुभ्र सुगंधी फुल उमललं . दिवस होता श्रावण शुद्ध प्रतिपदा !

आनंदीआजीनं नातवाचं नाव ठेवलं ‘आनंद’ ! आनंदाचे डोही आनंद तरंग ! भाऊदादा मात्र बाळाला आनंदऐवजी ‘बापूसाहेब’ म्हणूनच हाक मारीत. पुढे याच वंशवेलीवर एक कन्यारत्न जन्मले. नाव ठेवले संगीता ! आता दादांचा प्रपंच आणि साधना आता अधिकच सुरेलपणे सुरु झाली ! दरम्यानच्या काळात प. पू . भाऊदादांची बाह्य प्रकृती ढासळली. आणि मग परंपरेने लाभलेले ‘समाधीधन’ लाडक्या माधवाकडे सोपवत ते विश्वनाथ महाराजांच्या चरणी कायमचे विलीन झाले. दादा त्या आभाळ्याएवढ्या दुःखातून कसेतरी सावरत असतानाच साधनेच्या अंतःपुरात भाऊदादा प्रकटले आणि गुरुचरित्र व ज्ञानेश्वरीची पारायणे करण्याचा आदेश देऊन अंतर्धान पावले. मग दादांनी सर्वप्रथम गाठले गाणगापूर ! भीमा-अमरजेच्या त्या परमपावन संगमावर गुरुचरित्राची तीन पारायणे केली. पुढे दादांनी आळंदीच्या सिद्ध बेटात, चंद्रभागेच्या किनारी गुंडा महाराजांच्या चरणी तसेच श्री विश्वनाथ महाराजांच्या सिद्धभुमीत अर्थात कोल्हापुरात व्यास मठीत ज्ञानेश्वरीची अनेक पारायणे केली. याच दरम्यान आण्णा महाराजांनीही आपले पारमार्थिक धन दादांकडे सोपवून देह सदगुरू चरणी ठेवला. ‘अक्षर माधव’ ग्रंथातील रामराया सांगवडेकरांच्याच शब्दांत सांगायचं तर ‘आधीच श्री भाऊदादांच्या कृपेचं भांडवल दादांकडे होतेच, त्यात अण्णांच्या कृपेचा संगम झाला . या गंगा-यमुनेच्या ओघात आनंदीआईच्या ज्ञानेश्वरीच्या वाचातपाची सरस्वती गुप्तपणे मिसळली आणि दादा या त्रिवेणी संगमावरचा ‘प्रयागवट’ झाले. ‘ पण हा ‘प्रयागवटु’ तुकोबारायांच्या लव्हाळांपरी नम्र होता. आणि म्हणूनच लौकिकात प्रगट न होता स्वतःशीच अनाहत नाद एकत मग्न झाला. नंतर काही प्रसंगांनंतर तर चित्रपटसृष्टीचा संग कायमचा सोडून दादा केवळ साधनेत रममाण झाले होते. एके दिवशी ‘बैसता एकांती गोड वाटे’ अशा अवस्थेत बसलेले असताना पावसच्या स्वामी स्वरूपानंदांच्या भेटींचा आठव आला. समाधीस्थ होण्यापुर्वीच्या भेटीत स्वामींनी दादांना विचारले होते, ‘किती दिवस जगापासून स्वतःला लपवत एकटेच स्वानंदसुख उपभोगणार आहात ? श्री विश्वनाथ महाराजांची परंपरा तुम्ही पुढे प्रवाहित करायला हवी.’
स्वामींनी इतक्या स्पष्ट शब्दात सांगितलेलं असतानाही दादांनी स्वामी देहाने असेपर्यंत सदगुरू पदी आरूढ होणे टाळले होते . मनात या आठवणी घोळत असतानाच चमत्कार घडला. समोर दारात पेणच्या पू. अमलानंद (मामा) महराजांचे शिष्य दादांनी घेण्यासाठी आले होते. दादा त्यांचेसोबत पेणला गेले. तिथे पू . मामांनी स्वामी व दादांच्या भेटीविषयी जाणून घेतले व मोठ्या जिव्हाळ्याने ते दादांना म्हणाले, ‘ त्याच स्वामी स्वरूपानंदांचा दृष्टांत झाला असून त्यांनी ‘माधवनाथ’ असे नामाभिधान आपणास देऊन अनुग्रह परंपरा सुरु करण्याचा आदेश दिला आहे.’यावर दादा अक्षरश: मोहरून गेले असतानाच पू.मामांनी त्यांना दृढ आलिंगन दिले व स्वतःच्या हस्ताक्षरात लिहून दिले, ‘ अनादि आमुचा चाले नाथ पंथ । गोविंदनाथांचा माधवनाथ ‘. पेणला जाताना ‘माधवराव’ म्हणून गेलेले दादा गळ्यात हार घेऊन कोल्हापूरी परतले ते ‘श्रीमत सच्चिदानंद सदगुरू माधवनाथ’ या बिरुदासह !

कोल्हापुरात घरी आल्यावर आनंदीआईंनी पादयपूजा केली. घरातील सारी मंडळी अगदी आनंदून गेली ! सौ. श्यामलाने शांतपणे आपली पुढची सगळी जबाबदारी ओळखली ! श्री. विश्वनाथ महाराजांच्या पादुका देवघरातून दादांच्या बैठकीजवळच्या चौरंगावर आल्या ! दादा अधिष्ठानपिठी आरूढ झाले ! आणि मग त्रिविध तापांनी पोळलेले जन आता या अधिष्ठान पीठाकडे येऊ लागले . पारंपारिक पद्धतीने प्रवचन वा कीर्तन करणे हा दादांचा पिंडच नव्हता . पण त्यांची ती कृपामयी दृष्टी ! तो ओल्या शब्दांचा शिडकावा ! अन योगीक सामर्थ्यातून केलेली कृपा यामुळे येणारी मंडळी धन्य होऊन जात असत . अडचणी विचारण्यासाठी आलेले जन हळूहळू उपासनेने चित्तशुद्धी होऊन ज्ञानेश्वरीत रंगू लागले . दादा , बाळासाहेब व रामराया यांचे एकत्रित कुटूंब आता चांगलेच मोठे होऊ लागले . कारण जवळ आलेले भक्त्त घरचेच होऊन जात असत ! दादांच्या कीर्तीचा सुगंध पसरत गेला . पुणे , मुंबई , नागपूर , हैद्राबाद , अशा लांबलांबहून मंडळी येत गेली. आता भक्त्त म्हटले कि चार प्रकारे आलेच , पण आंतरिक आस्था असणारा कुणी भेटला की मग दादांनाही आनंद होत असे. पुढे भक्तांना अनुग्रह देण्याची ‘पिंडे पिंडाचा ग्रासु’ ही नाथांची रीत दादांनी सुरु केली . पहिला भाग्यवंत भक्त म्हणजे त्यांचा आत्मज आनंद ! आताचे आनंदनाथ ! ही सारीच भक्त्त मंडळी खूप भाग्यवान म्हणायला हवीत , कारण दादांसारखे प्रेमळ सदगुरू त्यांना लाभले . दादा प्रेमळ होत असे म्हणण्यापेक्षा प्रेम हा त्यांचा स्थायीभावच होता. आणि ते प्रेमळ होते म्हणूनच ते उच्चकोटीचे भक्तही होते. कारण भक्तीची व्याख्याच मुळी ‘सा त्वस्मिन परमप्रेमरूपा । ‘ अशी केली गेली आहे. प्रेम हा भक्तीचाच नव्हे तर योगाचाही पाया आहे असंच दादांचं प्रतिपादन असे. अनुग्रहित साधक साधनेविषयीच्या अगदी तांत्रिक शंका विचारू लागले की दादांचे उत्तर असे, ‘तुम्ही ‘भाव’ चांगला ठेवून श्‍वास घ्या व बाकी माझेवर सोपवा !’ नवरात्रातल्या शक्तीच्या उपासनेसाठीसुद्धा हेच सूत्र कायम ठेवत ते म्हणत , ‘भाव उत्तम ठेवा, काही चुकले तर प्रामाणिक अंतःकरणाने क्षमा मागून न घाबरता उपासना सुरु ठेवा’.

अशा प्रेममयी , शांत अन निरहंकारी दादांच्याकडे पाहिलं तरी मनाला आनंद होत असे. दादा म्हणजे सुखाचे आगर होत ! दादाचं हासणं, बोलणं, चालणं, वागणं, अगदी गोड होतं ! मधाळ होतं ! आघ शंकराचार्यांच्या शब्दांत सांगायचं तर,
वचनं मधुरम चरितं मधुरम, वसनं मधुरम वलितं मधुरम।
चलितं मधुरम भ्रमितं मधुरम, मधुराधिपते अखिलं मधुरम ।।
दादांचे हे माधुर्य ज्यांनी जवळून अनुभवलंय, उपभोगलयं त्या भक्तांना तुकोबाराय ‘नको ब्रह्मज्ञान । आत्मस्थितीभाव । मी भक्त तू देव । ऐसे करी ।’ असं का म्हणाले असतील हे आपसूकच समजत असे.

सदगुरू भक्तीचा हा सोहळा पुढे शब्दशः ‘उत्सव’ झाला. एका शुभ दिवशी आनंदी आईसाहेबांनी इच्छा व्यक्त केली, ‘विश्वनाथ महाराजांचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा व्हायला हवा. सदगुरू दादांनी ती शिरसावंद्य मानली आणि मग करवीर क्षेत्री विश्वनाथ महाराजांचा उत्सव सुरु झाला. उत्सव म्हटलं की , जागा मिळवणं, भक्तांच्या राहण्याची सोयी, प्रसादाची व्यवस्था, मांडव, सत्पुरुषांचे बोलावणे अशी एक ना अनेक कामे असतं. या सार्‍या गोष्टींमध्ये दादा स्वतः लक्ष घालत. पहिल्या उत्सवात आलेल्या पू. रामराया केळकरांपासून ते अलीकडे येणार्‍या पू. श्री औसेकरांपर्यंत, पुण्याच्या योगी ज्ञाननाथजी रानडयांपासून ते प . पू . शांतीनाथजींपर्यंत आणि प्रसिध्द कीर्तनकार बाबा महाराज सातारकरांपासून ते वेदमूर्ती स. कृ. देवधरांपर्यंत असे अनेक सत्पुरुष या उत्सवात येत असत. दादांशी या सार्‍याचा आत्यंतिक स्नेह असे. उत्सवात दादांच्या उत्सवाला उधाण येई. आधी घरात सुरु झालेला हा उत्सव पुढे पटांगणात, नंतर मांडवात असा वाढतच गेला . दरम्यान ‘श्री सदगुरू विश्वनाथ महाराज रुकडीकर’ ट्रस्ट’ ची स्थापना झाली. दादांनी ट्रस्टला जागा मिळण्यासाठी सर्वतोपरी कष्ट घेतले. उत्सवातल्या स्वच्छतेविषयी दादा आग्रही असत. ‘उत्सवात सारी सदगुरू परंपरा हजर असते, त्यांच्या चरणांना धूळ लागणार नाही याची काळजी घ्या’ असा त्यांचा आर्जव असे. दादांना स्वच्छतेबरोबरच दुसरी आवड होती ती म्हणजे सुगंधाची. आवड कसली वेडच म्हणा ना ! सार्‍या देव-देवतांना वा समाधींना पूजेदरम्यान ते अक्षरशः अत्तराभिषेक करत. पूजेतच काय, पण उत्सवाच्या प्रांगणात, घरात व जिथे जिथे जातील, तिथल्या सार्‍या प्रांगणात दादा भरपूर अत्तर शिंपडत असत. दादाचं सर्वत्र अत्तर शिंपडणं हि सृष्टीतल्या त्या सर्वात्मकाची पूजा असे कि श्‍वासासोबत आत घेतलेल्या सुगंधलहरींनी आज्ञाचक्राला नित्य सुगंधाभिषेक करावयाचा असे हे एक दादाच जाणोत !

महाराष्ट्रातील संतांना पंढरीची जितकी ओढ आहे, तितकी मोक्षाचीही नाही. दादाही याला अपवाद नव्हते. पंढरीच्या वारीला ते कुटुंबियांसमवेत आधीपासूनच जात. पण पुढे सर्व भक्तांसाठी दादांनी दिंडी सुरु केली अन माउलीसोबत वारी सुरु झाली ‘फलटण ते पंढरपूर’ ! खरे तर वारीच्या वाटेवर सदगुरूंची सेवा भक्तांनी करावी, पण रुकडीकरांची ‘नाथ घरची उलटी खूण’ दादांनी पंढरीच्या वाटेवरही जपली. खरे तर दादांचा अधिकार केवढा मोठा ! वारीतले काही अनुभव अगदी असामान्य आहेत. एकदा वारीतल्या गर्दीत एक सामान्य वेशातला वारकरी दादांजवळ आला आणि जन्मांतरीची ओळख असल्यासारखी सलगी दाखवत अत्तराचा फाया मागू लागला. दादांनी फाया दिला, आणि नाव विचारले. ती व्यक्ती ‘निळोबाराय’ असं म्हणाली आणि क्षणार्धात अक्षरशः गायब झाली. यावर दादा अत्यंत सदगदित झाले होते. दादांना दरवर्षी वारीच्या वाटेवर श्री माऊलींच्या रथावर घेतले जाई. शेवटच्या वारीत माऊलींची रथावर भेट झाल्यानंतर पुढे सुमारे अर्धा तास दादा ‘अवस्थेत’ गेले होते. आणि हा इतका मोठा अधिकार सत्पुरुष रात्री टॉर्चघेऊन खाचखळग्यातून सर्वांना झोपण्यासाठी तंबू मिळाला आहे न, सर्वांची जेवण झाली आहेत ना हे जातीने पाहत असे. नम्र झाला भूता । तेणे कोंडिले अनंता ।।

दादांना वारीच्याच नव्हे तर जीवनाच्या वाटेवरही हसत खेळत जाणं पसंत होतं. चेहरा आंबट करून केलेलं अध्यात्म दादांना पसंत नव्हतं. दादाचं अध्यात्म हसत खेळत होतं. ज्ञानेश्वरीतल्या १८ व्या अध्यायात माऊलींनी सदगुरुंचं वर्णन ‘केलिप्रिय’ या शब्दात केलं आहे. दादा खर्‍या अर्थाने ‘केलिप्रिय’ होते. श्री ज्ञानेश्वरीतल्या ‘चिदविलासवादावर’ त्यांनी कधी प्रवचन दिली नाहीत, पण अखंड अनुसंधान ठेवत आयुष्यातला प्रत्येक क्षण ‘साजरा’ करून दाखवला. दादांकडे पाहून ‘विषय तो त्यांचा’ झाला नारायण ।’ म्हणजे काय हे समजत असे.

वारी आणि उत्सव सुरेखपणे सुरु होते. श्री विश्वनाथ महाराजांचा ध्वज डौलाने फडकत होता. पण असं असलं तरी दादांना एक गोष्ट आतून अस्वस्थ करत होती. ही संपूर्ण परंपरा ज्यांच्या कृपा प्रसादाने सुरु झाली होती, त्या ‘देवनाथ’ महाराजांचं चित्र, चरित्र, समाधी काहीच हाती नव्हतं. दादांना अनुग्रहित झाल्यापासूनच देवनाथ महाराजांविषयी एक विशिष्ट आकर्षण वाटे. श्यामला आईसाहेबांस दरम्यानच्या काळात स्वप्नामध्ये देवनाथ महाराजांनी दृष्टांत देऊन ‘समाधी शोध घेऊन पूजा सुरु करण्याचा आदेश’ दिला होता. दादांच्या आज्ञेनुसार त्या सिद्ध चरित्राची पारायणे व देवनाथांच्या जपात मग्न होऊन गेल्या होत्या. एका मंगल क्षणी ध्यानावस्थेत देवनाथ महाराज अवतरले आणि चित्र रेखाटण्याची अनुज्ञा दिली. परंपरेच्या कुलस्वामींचे चित्र आता देवघरात आले असले तरी दादांना समाधी मिळाल्याशिवाय स्वस्थता लाभणार नव्हती. ‘देवनाथ महाराज समाधी शोध’ हे खरंतर एक स्वतंत्र आख्यानंच होईल. देगलूर, नेवासा, पैठण इथले अनेक परिसर, नदीचे किनारे दादांनी घरची मंडळी व भक्तांसोबत अक्षरशः पिंजून काढले, पण देवनाथ महाराजांना मोठीच परीक्षा बघावयाची होती. सुमारे १६ वर्षांच्या या ‘समाधी’ शोध व त्यासाठीची उपासना’ या काळात दादा सोडून बाकी सार्‍याची क्षणभर चलबिचल अवस्था होईल, पण दादा मात्र अविचल निष्ठा व श्रद्धेने ते कार्य सुरु ठेवत. अखेर तो योग जुळून आला. ज्याप्रमाणे माऊलींच्या अंतरीची कळ जाणून एकनाथ महाराजांनी ती मुळी बाजूला करून जगाला माऊलींच्या समाधीचे दर्शन करविले, त्याचप्रमाणे दादांनी देवनाथांच्या समाधीचा शोध लावून परंपरेला व भक्तांना कृतार्थ केले. दादाचं पैठणला आधी समाधी शोधासाठी व नंतर पूजेसाठी वारंवार जाणं होऊ लागलं.

देवनाथ महाराज हे मुळचे शक्तीचे उपासक ! त्यामुळेच की काय याच दरम्यानच्या काळात दादा नवरात्रात विशिष्ट उपासना करू लागले. भक्तांसाठीही उपासना सांगू लागले. अष्टमीच्या दिवशी साक्षात सगुण रुपात ‘आई भगवती’ दादांकडून पूजा स्वीकारत असत व त्यांच्यात संवाद होत असे. दादांचा योगातला अधिकार फार मोठा होता. दादा स्वतःविषयी, स्वतःच्या साधनेविषयी कधीच बोलत नसतं. ‘अलौकिक’ नोहावे । लोकांप्रती ।।’ हे माऊलींची साधेपणानं वागण्याचं सूत्र त्यांनी अंगी बाणलं असल्यामुळे त्यांचा अधिकार भक्तांना कळत नसे. एकदा वीरनाथ, मल्लनाथ महाराजांच्या थोर परंपरेतील श्री ज्ञानेश्वर महाराज औसेकर कोल्हापुरात तीन दिवस राहयला आले होते. त्यावेळी संध्याकाळी ज्ञानेश्वरी झाल्यावर बोलताना ते अधिकार वाणीने म्हणाले होते, ‘तुम्ही सारे अत्यंत भाग्यवान आहात, कारण तुम्हांस दादांसारख्या दिव्य सत्पुरुषाचा लाभ होतो आहे, पण तुम्ही तितकेच दुर्दैवी देखील आहात. कारण तुम्ही त्यांना ओळखलेच नाही.’ ,’अहो, दादा म्हणजे साक्षात चालतं बोलतं परब्रम्हच होतं !’ अधिकारी भक्तांना दादांच्या चरणी मोठ्या अनुभूतींचा प्रत्त्यय यॆई. हंसगीतांचा एक अनुभव दिव्य कोटीतला आहे. हे ‘हंसगीत’ कोण, तर पुण्याचे श्री. मधुकर कुलकर्णी ! वयाच्या साठीनंतर उपासना आणि साधना सुरु केलेले हे ८० वर्षांचे तरुण म्हणजे दादांचा श्वास प्यायलेले भिरभिरते वारेच म्हणा ना ! याच हंसगीतांकडून सदगुरू दादांच्या कृपेने ‘श्री वानरगीता ‘ , ‘विश्वनाथ चरित्रामृत’ , ‘देवनाथायन’ , श्री सदगुरूंची ‘अष्टके अन आरत्या’ हे सारं नितांतसुंदर लिखाण करवून घेतलं होतं. याच हंसगीतांच्या पुण्यातल्या घरी नित्याची साधना करून दादा हंसगीतांसमोर उभे राहिले असताना अचानक हंसगीतांना दादांच्या भ्रूमध्यावर लखलखता नीलमणी दिसला. क्षणात त्या निलमण्याऐवजी सिंदुरवदन श्री गणेश दिसू लागला व गणेशाच्या भ्रूमध्यावर नीलमणी दिसू लागला. हंसगीत आनंदात नि आश्चर्यात न्हाऊन निघाले. दादांना अनुभव सांगितला असता, दादा केवळ प्रसन्न हसले. दादा कसे हसले ? भक्तीभावाने पहिले असता , तो ‘पंढरीचा निळा’ जसा मंद हसताना दिसतो अगदी तसेच ! दादा म्हणजे सगुण परब्रह्मच होते. त्यांची शक्तीची उपासना पाहून कुणाला ठाकुरांची आठवण होई तर कुणी त्यांना साईबाबांच्या रुपात बघत ! तर कुणाला ते आदिशक्तीच्या स्वरुपात भावत ! साधनेतला तो आत्ममग्न भाव , मंद चेहरा व ती अर्ध उर्ध्व दृष्टी पाहून त्यांना ‘शिव’ म्हणावं कि त्यांच्याकडची सोनेरी घड्याळं, सोनेरी चष्मे नी सोनेरी किनारीची तलम ,रेशमी उपरणी व डोळयातून झळकणारं ऐश्वर्य पाहून ‘महाविष्णू’ म्हणव हा मोठाच प्रशन भक्तांना पडत असे.

आपणास ‘निरंतर जागविणार्‍या’ या ‘संतांचे उपकार मानण्यासाठी’ दादांनी पंरपरेची खूप मोठी सेवा केली. लौकिकदृष्ट्याच सांगायचे तर निवृत्तीनाथ महाराजांची त्र्यंबकेश्वरची समाधी, सोपनकाकांची सासवडची समाधी अशा अनेक ठिकाणी बांधकामांच्या स्वरूपात सेवा केली. देगलूर, नेवासे, अशा परंपरेच्या ठिकाणी भक्तांकडून ज्ञानेश्वरी पारायण सेवा करवून घेतली. माऊलींसोबत वारीची सेवा केली. त्यांचे अनेक संतांशी आंतरिक जिव्हाळ्याचे संबंध होते. वटवृक्ष स्वामी समर्थांशी त्यांचे गूढ सख्याचे नाते होते. तुकोबारायांचे समकालीन विजापूरचे श्री रूक्मांगद स्वामी यांचेशी दादांचा नित्य सुसंवाद होई. श्री रूक्मांगद स्वामींनी एकदा साधनेत दादांना ‘नाडी परीक्षा’ व अनेक मोठ्या आजारांसाठी ‘सिद्ध औषधी’ चा प्रबोधन केला. दादांचे शिष्य पुण्याचे जेष्ठ आयुर्वेदतज्ञ डॉ. समीर जमदग्नी व त्यांचे शेकडो विद्यार्थी वैद्य व हजारो रुग्ण आज या दिव्य नाडी परीक्षा व ‘आदेश’ औषधांच्या कृपा प्रसादाने धन्य होत आहेत. विजापूर येथील रामचंद्र तिकोटेकरांच्या पुण्यतिथीनिमित्य श्री सिद्ध चरित्राचे पारायण सेवा दीडदोनशे भक्तांकडून करवून घेत. सदगुरुंशी तदाकार होण्याची निर्गुण अनुभूती व सगुण रूपातील दादांची सेवा व सानिध्य असा दुहेरी परमानंद सारे साधक मोठ्या उत्साहात लुटत असत. या सार्‍या कार्यक्रमांचेवेळेची संध्याकाळ रामरायांच्या ज्ञानेश्वरीत रंगून जात असे. झाले असे कि , एकदा घरात दादांनी बंधू श्री रामराया सांगवडेकरांवर विशिष्ट कृपा केली अन ज्ञानेश्वरी सांगण्याचा आदेश दिला. त्या दिवसांपासून गोविंदनाथांच्या या आत्मजाच्या मुखातून रसाळपणे माऊलीचा हृदगत प्रकट होऊ लागले. घरी, मंदिरात, वारीत, पारायणांच्या वेळी रामरायांची ज्ञानेश्वरी रंगू लागली. मंचावर माधोमध विश्वनाथ महाराजांच्या पादुका ! गुलाबाच्या पाकळ्या उलगडाव्यात इतक्या अलगदपणे ‘ग्यानबाची मेख’ उकलून दाखविणारे रामराया ! आणि बाजूला लोडाला टेकून मंद स्मित करणारे दादा ! ‘ज्ञान -ज्ञाता – ज्ञेय’ ही सारीच त्रिपुटी ज्या श्रोत्यांना ‘सगुण रुपात’ अनुभवायला मिळाली ते खरेच भाग्यवान !

दरम्यानच्या काळात संसार सुरेलपणे सुरूच होता. यथावकाश पुत्र आनंद याचं लग्न होऊन सून ‘विश्वा ‘ घरात आली होती. आणि आता दादांच्या गोकुळात नातू ‘निरंजनदास’ रांगू लागला होता, बागडू लागला होता. जन्मानंतरच दादांनी नातवाच्या ब्रम्हरंध्रावर हात ठेवून काय क्रिया केली नि कोणता आशीर्वाद दिला हे त्यानाच ठाऊक !

प. पू. देवनाथ महाराजांची समाधी मिळाल्यावरच खरंतर दादांना इतिकार्य संपल्यासारखं वाटत होत. ‘सांडली त्रिपुटी । दीप उजळिला घटी ।। तुका म्हणे आता । उरलो उपकारापुरता ।।’ हि अवस्था प्राप्त झाली होती. पण तरीही माऊलींच्या कृपेने शेवटची काही वर्षे मिळाली होती. या काळात दादा पुन्हा एकदा ‘यारे यारे लहान थोर ‘ म्हणत भक्तांच्या कल्याणातच रममाण झाले. दरम्यान ट्रस्टच्या समाजसेवी योजना वाढत चालल्या होत्या. एका शुभ दिनी ट्रस्टला जागा मिळून तिथे ‘विश्वपंढरी’ हे मोठे संकुल उभारलं जात होत. पण हे सांर सुरु असताना दादा मात्र आपल्या आराध्य दैवतांशी अर्थात श्री सदगुरू देवनाथ महाराजांशी तदाकार होत चालले होते.

नारद भक्ती सुत्रांमध्ये आत्म निवेदनापर्यंतची नवविधा भक्ती सांगून झाल्यानंतर त्याही पुढची अवस्था वर्णन करणारे सूत्र आहे ‘तन्मयक्ति !’ आराध्य दैवतांशी तदाकार होण हीच ती अवस्था होय. दादांच्या शेवटच्या काही दिवसांमधील खासगी डायर्‍यामध्ये उल्लेख आहेत, ‘स्वत:स आरशात पाहणे अवघड झाले आहे कारण प्रतिमेऎवजी, श्री सदगुरुंचे (देवनाथ महाराज ) दर्शन होत आहे. देह मोठा होत आहे, असे वाटत आहे इ. ‘ सगुणातून निर्गुणाकडे व स्थूलातून सूक्ष्माकडच्या या प्रवासातले हे शेवटचे टप्पे होते. आणि मग काही भौतिक कारणांचे निमित्त झाले आणि हजारो भक्तांचा आधारवड , रामराया व बाळासाहेबांचा सखा, श्यामलाचा प्राणेश्वर, आनंद व अक्कांच (संगीता) सर्वस्व आणि हंसगीतांचा हा चित्सूर्य मावळला, तो दिवस होता चैत्र कृष्ण सप्तमी, ११ एप्रिल, २००४!

दादा आज देहाने नसले तरी तो सुगंध आजही आहे. विश्वपंढरीतल्या त्यांच्या समाधीवर श्रद्धेने डोई ठेविले असता, भक्तांना त्यांची अनुभूती आजही येते.