विश्वामध्ये भारतीय संस्कृती ही अनेक दृष्टीने श्रेष्ठ समजली जाते. या संस्कृतीने विश्वाला प्रदान केलेली अनमोल देणगी म्हणजे सदगुरू परंपरा.
ना आदिगुरु शंकरा । लागोनि शिष्यपरंपरा । बोधाचा हा संसरा । जाला तो आमुते ।।
आदिनाथ शंकरांपासून सुरु झालेली ही नाथ परंपरा श्री ज्ञानेश्वर माऊलींपर्यंत आली. आदिनाथ-मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ – गहिनीनाथ – निवृत्तीनाथ – ज्ञानदेव ही नाथपरंपरा सुप्रसिद्ध आहे. ज्ञानदेवांच्यानंतर अनेक ठिकाणी या परंपरेच्या शाखा वाढल्या. हीच परंपरा देवनाथांपासून सुरु होऊन दादामहाराजांपर्यंत आली. सोsहं साधना हा या परंपरेचा प्रमुख धागा आहे. दक्षिणकाशी म्हणून ओळखल्या जाणार्या करवीर नगरीमध्ये नाथसंप्रदाय व वारकरी संप्रदाय यांचा सुरेख संगम असलेले ठिकाण आहे.… विश्वपंढरी ! देवनाथांपासून सुरु झालेली ही परंपरा आजही इथे प्रवाही आहे.
सदगुरु परंपरा
नाथांच्या परंपरेमध्ये काही चरित्रे ही दुर्मिळच राहिली. असेच एक संतचरित्र जवळजवळ तीनशे वर्ष दृष्टीआड राहिले. ते म्हणजे सदगुरु श्री देवनाथ महाराज. महाराष्ट्राच्या संतपरंपरेमध्ये झाकून राहिलेले हे संतचरित्र प. पू . दादामहाराजांनी प्रकाशात आणले. पैठणमध्ये एकनाथ महाराजांच्या वाडयाच्या पश्चिमेस नाग घाटावर जाण्याच्या मार्गावर, कृष्ण दयार्णव मठाशेजारी गोदावरी नदीच्याकाठी प. पू . देवनाथ महाराजांची समाधी आहे. आज तिथं अतिशय सुंदर मंदिर प. पू . दादांच्या आशीर्वादाने आकाराला येत आहे. देवनाथ महाराजांच्या समाधी शोध मोहिमेविषयी अक्षर माधव या ग्रंथामध्ये सविस्तर वाचावयास मिळते. प. पू . देवनाथ महाराजांचा समाधी दिन अधिक श्रावण वघ अष्टमी आहे.
काही संताच्या घराण्यांमध्ये वंशोवंशी एखादया देवतेची आराधना चालू असते. आशीच आराधन देगलूर येथील संत चूडामणी यांच्या वंशामध्ये उपास्य दैवत श्री शंकर यांची होत असे. चुडामाणींची वाणी शुद्ध व निर्मळ होती. योगमार्गाची अनुभूती होती. आईवडीलांना कैलास लोक मिळाल्यानंतर चूडामणींना गुरुची महती लक्षात आली. त्याचदरम्यान सदगुरु देवनाथ महाराज तिथे आले. आणि त्यांनी चूडामणींना अनुग्रह देऊन ज्ञानेश्वरीची हस्तलिखित प्रत त्यांच्या हाती दिली. आपल्या वयाच्या शंभराव्या वर्षी संत चूडामणी देगलूर येथे ईश्वरचरणी एकरूप झाले.
नाथ परंपरेमध्ये मच्छिंद्र – गोरक्ष किंवा निवृत्ती – ज्ञानदेव या जोड्या अशा आहेत की त्यांनी नाथ चळवळीचा पाया अधिक घट्ट केला. त्याच परंपरेमध्ये देवनाथ – चुडामणी – गुंडा या जोड्यांनीदेखील अर्वाचीन महाराष्ट्रामध्ये नाथ परंपरेचा सर्वत्र प्रसार केला. श्री गुंडामहाराजांचा जन्म शके १६७५ (इ. स . १७५३) मध्ये झाला. वयाचा अकराव्या वर्षी आईवडीलांचे छत्र हरपले. गुंडा महाराजांचा भजन कीर्तनाचा व्यासंग वाढत गेला. याचदरम्यान त्यांची संत चूडामणी यांच्याशी भेट झाली. शके १६८९ साली चुडामणींनी आपली कन्या राजाई हिचा विवाह गुंडामहाराजांबरोबर करून दिला. गुरुकृपेमुळे गुंडा महाराजांना गुह्य ज्ञान प्राप्त झाले. गावोगावी गुंडामहाराजांची महती वाढत गेली. गौड, द्रविड, तेलंगण , कोकण , कर्नाटक , महाराष्ट्र इ . भागातील लोक त्यांचे शिष्य बनले. वयाच्या ६५ व्या वर्षी अश्विन शु. ३, सोमवार, शेक १७३९ रोजी पंढरपुरामध्ये गुंडा महाराजांनी या ऐहिक जागाच निरोप घेतला. चंद्रभागेच्या वाळवंटात आज आपणांस जी देखणी समाधी दिसते ती गुंडा महाराजांची आहे.
याच परंपरेतील आणखी एक सत्पुरुष श्री रामचंद्र महाराज बुटी ! हे नागपूरजवळील बोरीबुटी गावचे. तेथील राजाच्या पदरी ते मंत्री म्हणून काम पाहत . श्री रामचंद्र महाराज हे गुंडामहाराजांचे शिष्य. श्री रामचंद्र महाराजांचे जीवन मुक्तावस्थेचे होते. श्री महादेवनाथ व श्री रामचंद्र हे दोगेही गुंडा महाराजांचे शिष्य. तथापि रामचंद्र महाराजांची झालेली प्रगती पाहून त्यांनी रामचंद्र महाराजंचे शिष्यत्व स्वीकारले. आपल्या सीताबर्डी (नागपूर) येथील वाड्याच्या पाठीमागे रामचंद्र महाराजांनी कार्तिक शुद्ध एकादशी या दिवशी संजीवन समाधी घेतली.
श्री महादेवनाथ महाराज हे नागपूरकडील. त्यांचे व रामचंद्र महाराज बुटी यांचे बालपण एकत्रच गेले. श्री बुटी महाराजांप्रमाणेच श्री महादेवनाथ ही गुंडा महाराजांचे नामधारक शिष्य होते. महादेवनाथ हे निर्मळ मनाचे असल्याने, बुटी महाराजांची थोरवी लक्षात घेऊन त्यांचा अनुग्रह मागितला. महादेवनाथांचे मनोरथ बुटी महाराजांनी लगेच पूर्ण केले. गुरुबंधुचे नाते आता गुरुशिष्याचे झाले. त्यांनी श्री महादेवनाथांना सोsहं जपाचे अधिकार दिले. शिष्य पूर्णतेला आल्याचे पाहून गुरूंना आनंद झाला. बुटी महाराजांनी महादेवनाथांना जगदुध्दारासाठी दक्षिणेकडे जाण्यास सांगितले. रामचंद्र महाराज तिकोटेकर हे सोsहं साधना प्रवाहित ठेवण्याच्या योग्यतेचे आहेत हे लक्षात घेऊन श्री महादेवनाथ महाराजांनी त्यांना अनुग्रह दिला. पुढे दास्यभक्तीसाठी महादेवनाथांनी मारुतीचे उपासना करण्यास सांगितले. ही उपासना आजही श्री दादा महाराज सांगवडेकर यांच्या घराण्यात चालू आहे. आश्विन वद्य तृतीया शके सतराशे शहाऐंशी या दिवशी श्री सदगुरु महादेवनाथ महाराज चिंचणी गांवी समाधिस्त झाले.
सोsहंसाधनेचा प्रसार पूर्व-उत्तर महाराष्ट्रामध्ये आधीपासून फोफावला होता. पश्चिम-दक्षिण महाराष्ट्रात सोsहं साधना वाढण्याच्या काल खर्या अर्थाने रामचंद्र महाराज तिकोटेकर यांच्यापासून सुरु होतो. पुणे नगरीच्या शेजारी केळवड हे यांचे जन्मगांव . चिंचणीतील गाढे अभ्यासक आत्माराम दीक्षित यांच्या मार्गदर्शनाखाली यांचे वेदाध्ययन झाले. भजन कीर्तनाचाही छंद लागला . वडिलांच्या निर्याणानंतर रामचंद्रांना सदगुरूंची ओढ लागली . त्या ओढीतूनच ते गाणगापूरला पायी चालत गेले. श्री दत्तगुरूंचे दर्शन घेऊन दोन महिने तेथे राहून दत्तात्रेयांची आराधना केली. दत्तगुरूंनी प्रसन्न होऊन स्वप्नामध्ये येऊन महादेव यती तुला भेटेल असे सांगून चिंचणीस परत जाण्यास सांगितले. पूजेसाठी बागेतील फुले आणावयास जाताना वाटेत अनपेक्षितपणे महादेवनाथांचे दर्शन झाले . तथापि सदगुरू प्राप्तीचा क्षण अजून यायचा होता . परंपरा रक्षण , कुलपरंपरा , वेदाध्ययन परंपरा तसेच गुरुशिष्य परंपरा याची जाणीव रामचंद्रांच्या ठिकाणी झाल्यावर महादेवनाथांनी सोsहंदिक्षा दिली . रामचंद्र महाराजांनी इ . स . १८६५ मध्ये कोल्हापुरात अनुग्रह देण्यास सुरुवात केल्यानंतर परंपरेची एक शाखाच येथे वाढू लागली . यामध्ये स्वामी स्वरूपानंदांचे परात्परगुरु श्री विश्वनाथ महाराज रुकडीकर , प्रकांडपंडित श्रीपतीनाथ गोवर्धन आणि वेदांती खंडोकृष्ण तथा बाबा गर्दे यांसारख्या शिष्यांचा समावेश होतो. अशा या शिष्यांकडून रामचंद्र महाराजांनी सिद्धचरित्र हा ग्रंथ लिहून घेतला.अत्यंत निगर्वी , शांत वृतीने राहणारे स्वानंदस्वरुपात रममाण असणारे रामचंद्र महाराज चैत्र वैद्य ६, शके १८१४ (इ . स . १८९२) रोजी विजापूर येथे समधिस्थ झाले.
सदगुरू श्री विश्वनाथ महाराज हे मूळचे पेठ वडगांवचे . वयाच्या १२व्या वर्षापासून १८व्या वर्षापर्यंत त्यांनी पंढरपुरात राहण्याचा योग आला. या काळातच त्यांना दिव्यदृष्टी प्राप्त झाली .श्री विश्वनाथ महाराजांच्या ठिकाणी सदगुरू भेटीचा तळमळ खूप वाढली. कोल्हापूरातील मंगळवार पेठेत विठोबा मंदिरामध्ये रामचंद्र महाराज तिकोटेकर यांची प्रवचने सुरु होती. विश्वनाथ महाराजांनी रामचंद्र महाराजांकडे अनुग्रह मागितला . परंतु महाराजांनी लगेच अनुग्रह दिला नाही. ज्ञानेश्वरीचा सप्ताह श्रद्धेने करण्यस सांगितले. श्री विश्वनाथ महाराजांनी गंगावेशीतील व्यासमठीत बसून सप्ताह सुरु केला . या पारायणादरम्यान त्यांच्या हातास वाघचौडा (मोठा फोड) झाला . हात दुखत असतानाही ते पारायण पूर्ण केल्याचे पाहून तिकोटेकर महाराजांनी त्यांना अनुग्रह दिला व नाथपंथ पुढे प्रवाहित करण्यास सांगितले. प्रसाद म्हणून हातावर ज्ञानेश्वरी ठेवली.
ज्ञानेश्वरी प्रवचनाच्या निमित्ताने ते गावोगावी फिरू लागले. कोल्हापूरपासून १५ कि.मी. अंतरावर रुकडी गांव आहे. तेथे नारोपंत नारायण कुलकर्णी हे मोठे ईनामदार होते. शिवाय तिकोटेकर महाराजांचे ते शिष्य होते. त्यांनी श्री विश्वनाथ महाराजांना रुकडी येथे आपल्या घरी नेले . नाथपंथाचा मार्ग वाढविण्यास पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वास दिल्यावर सन १८७८ पासून श्री विश्वनाथ महाराज रुकडी येथे राहू लागले . तिकोटेकर महाराजही रुकडीस येत असत . नारोपंताच्या मुलांना विश्वनाथ महाराजांनी अनुग्रह देऊन नाथपंथाच्या मार्गावर आणले. यातील गोविंद हे पुढे श्री गोविंदनाथ झाले. श्री विश्वनाथ महाराजांचे आणखी एक शिष्य म्हणजे श्री गणेश नारायण वैद्य. सन १८८९ साली रेल्वेच्या कामावर रुकडी येथे काम पहात असताना महाराजांचा अनुग्रह मिळाल्याने ते योगमार्गात पूर्ण अधिकारी झाले . पावसचे स्वामी स्वरूपानंद हे त्यांचेच शिष्य.माघ शुद्ध ३, शके १८४० (इ . स . १९१९) रोजी बरोबर १२ वाजता विश्वनाथ महाराज रुकडी येथे समाधिस्थ झाले. त्यापूर्वी गोविंदनाथांना जवळ बोलावून परंपरेची धुरा वाहण्याचे कार्य त्यांच्यावर सोपविले .
गोविंदनाथ महाराज उर्फ भाऊदादांना खेळण्या – बागडण्याच्या वयातच श्री विश्वनाथ महाराजांचा सहवास मिळाला. श्री विश्वनाथ महाराज हे त्यांचे दैवतच बनले. त्यांच्या अनुग्रह लाभल्यामुळे सर्व आयुष्यच ज्ञानेश्वरीमय झाले. ज्ञानेश्वरीचे डोळस वाचनाबरोबरच उपनिषेद, अमृतानुभव, बायबल, कुराण याचाही त्यांनी सखोल अभ्यास केला. भाऊदादांचे व्यक्तिमत्व अत्यंत रुबाबदार होते. सहा फूट उंची, बलदंड शरीर, तेजस्वी पण स्नेहाळ डोळे अशा भाऊदादांना पाहताच लोक स्तिमित होत.विश्वनाथ महाराजांनी आपले सारे अध्यात्मिक वैभव भाऊदादांच्या झोळीत घातले. अनुग्रहाचा अधिकारही दिला. माधवनाथ (दादामहाराज) , नरहरी, श्रीनिवास व रामचंद्र ही चार भावंडे गोविंदनाथांची अनुग्रहीत आहेत. यापैकी श्री माधवनाथ यांना परंपरा पुढे चालविण्याचा अधिकार भाऊदादांना दिला. २० जानेवारी, १९६७ रोजी गोविंदनाथ महाराजांनी समाधी घेतली. रुकडी येथे पंचगंगातीरी त्यांच्याच मळ्यात श्री विश्वनाथ महाराजांच्या समाधीशेजारी भाऊदादांची समाधी आहे.
नाथपरंपरा वृद्धिंगत होणार असली की त्याचे बीज कुठेतरी निर्माण होते आणि प्रसवण्यासाठी योगियांच्या कुळी धाव घेते.श्री विश्वनाथ महाराज रुकडीकर ज्या घराण्याचे कुलदैवत होते त्या घराण्यात फाल्गुन वघ षष्ठी शके १८५४ (इ . स . २७ मार्च, १९३२) रोजी श्री. माधव व्यंकटेश कुलकर्णी यांचा जन्म झाला. सदगुरू श्री गोविंदनाथ महाराजांचे दादामहाराज हे पुतणे. दादामहाराजांच्या घरात लहानपणापासूनच ज्ञानेश्वरीची पारायणे, प्रवचने, कीर्तने सतत चालू असायची. त्यामुळे बालवयातच मनावर ज्ञानेश्वरीचा पगडा बसला. दादामहाराजांचे कुटुंबीय कोल्हापूरात राहावयास गेले तेव्हा दादा महाराजांच्या आईंनी – माऊली आनंदी – श्री विश्वनाथ महाराजांच्या नित्य वापरातील पादुका प्रसाद म्हणून मागून घेतल्या. आजही त्या पादुका दादा महाराजांच्या देवघरात आहेत. दादा महाराजांनी सदगुरू श्री विश्वनाथ महाराजांचा पुण्यतिथी उत्सव सोहळा १९७९ साली सुरु केला. आजतागायत तो उत्सव सुरु आहे.सात दिवस ज्ञानेश्वरी पारायण, सोहळा, प्रवचने, भजन-कीर्तनात साधक रंगून जातात.
परंपरेचे कुलदैवत असणारे श्री देवनाथ महाराजांची दुर्लक्षित समाधी शोधून काढून दादा महाराजांनी ती प्रकाशात आणली. कदाचित हेच त्यांचे जिवितकार्य होते. आज त्याठिकाणी अतिशय सुंदर मंदिर उभे राहात आहे. दादामहाराजांनी सदगुरू विश्वनाथ महाराज रुकडीकर ट्रस्ट स्थापन करून आधात्म्याला सामाजिकतेची जोड दिली. तसेच विश्वपंढरीच्या प्रांगणात श्री विश्ववती आयुर्वेद चिकित्सालय व पंचकर्म केंद्राची स्थापना केली.